ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १४ - शेतक-यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आजपासून एक महिन्याने म्हणजे १४ सप्टेंबर पासून जनावरांसहीत जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० दिवसात एकदाही सभागृहात आले नाहीत याचा उल्लेख करत भाजपाचे नेते भगवे घालून येतात त्यांना शेतक-यांशी काही देणंघेणं नाही अशी टीकाही पवारांनी केली आहे.
तब्बल ३५ वर्षांनी शरद पवार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असून सुरुवात उस्मानाबादपासून करण्यात आली आहे. तालुका तालुक्यात आजपासून रान पेटवण्यात येणार असल्याचे सांगताना १४ सप्टेंबरला तुरुंग कमी पडले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळग्रस्त शेतक-यांसह आंदोलकांनी घराबाहेर पडायचं आणि सरकारलाच सांगायचं की आमची रहायची सोय करा, अशा स्वरुपाची रणनीती त्यांनी आखली आहे. उस्मानाबादमध्ये ८८ शेतक-यांनी आत्महत्या केली असून पवारांनी शेतक-यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.
नव्या सरकारला वर्ष उलटून गेलं असलं तरी अद्याप सूर सापडला नसल्याची टीका मोदी सरकारवर पवारांनी केली आहे. शेतक-यांना दुष्काळानं ग्रासलं आहे, जनावरांना पोसायचं कसं हा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे आणि सरकार यावर काहीही मार्ग काढत नाही अशी टीका पवारांनी केली.