बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊसदर दिला आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांनी मागील वर्षी कमी दिलेला दर अगोदर द्यावा, मगच ‘माळेगाव’ची तुलना अन्य कारखान्यांशी अजित पवार यांनी करावी. माळेगावने विक्रमी दर दिल्यानंतर ‘सोमेश्वर’च्या दरात वाढ करण्यात आली. तरीदेखील माळेगावचा दर जास्त आहे, असा दावा कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. माळेगाव (ता. बारामती) येथे तावरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात तावरे यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली. या वेळी कारखान्याचे ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख, नगरसेवक सुनील सस्ते, नगरसेवक बबलू देशमुख, नगरसेवक विष्णूपंत चौधर, भाजपचे समन्वयक प्रशांत सातव, माजी सभापती अविनाश गोफणे आदी उपस्थित होते. माळेगाव कारखाना सभासदांना २७५० रुपये प्रतिटन देणार आहे. खोडकीचे १०० रुपये व अनुदानाचे १५० रुपये असे ३ हजार रुपये कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ‘सोमेश्वर’ने खोडव्याला २८५० रुपये सर्वाधिक दिले आहेत, असा दावा केला होता. अजित पवार यांचे गणित चुकत आहे, असा टोला तावरे यांनी मारला. गतवर्षी तुमच्या ताब्यातील कारखान्यांनी उसाला प्रतिटन २२०० ते २२५० रुपये अंतिम दर दिला आहे. माळेगावच्या तुलनेत ५५० ते ६०० रुपये कमी दर शेजारच्या कारखान्यांच्या सभासदांना मिळाला. हे कमी दिलेले पैसे अगोदर द्या, अशी मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर) >शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर चंद्रराव तावरेंची टीका...ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. १९६७ पासून अनेक चढउतारांमध्ये त्यांच्याबरोबर राहिलो. पूर्वी राजकारण, समाजकारण करताना पवार तालुक्यातील जाणकारांचे मत विचारात घेत. अलीकडे मात्र राजकारण आणि समाजकारणात फारकत घेतली. जनतेच्या हिताला बाधा येऊ लागली. मागील ५० वर्षे त्यांनी फक्त आपापसात झुलवण्यात घालविली. इथेनॉलला चालना मिळण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी ते केंद्रात मंत्री असताना केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडविला. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
मागील वर्षी कमी दिलेले पैसे सभासदांना अगोदर द्या
By admin | Updated: January 16, 2017 01:20 IST