ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ - देशातील साधा भोळ्या जनतेला खोटी स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेवर आलात, आता तुमच्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागितला तर राग का येतो असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. महाराष्ट्राने गेल्या १५ वर्षात प्रगती केली असून गुजरातपेक्षा महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
कोल्हापूरमध्ये गुरुवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. पाकिस्तानला सडेतोड उत्तर का दिले नाही, १०० दिवसांत तुम्ही काय विकासकामं केली असा सवालही त्यांनी मोदी सरकारला केला आहे. शिवसेना व भाजप हे संधीसाधू पक्ष असून निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रही येतील असे त्यांनी म्हटले आहे. विरोधक महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या विकासाचे दाखले देतात पण गुजरातपेक्षा महाराष्ट्रच अव्वल राज्य आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.