बगमारे यांना राष्ट्रपती पदक: माने यांना पोलीस पदक नागपूर : पोलीस दलात गुणवत्तापुर्ण आणि उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल नागपुरातील एका अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक तर, सात अधिकाऱ्यांना पोलीस पदके घोषित झाली. प्रजासत्ताक तसेच स्वातंत्र्य दिनी सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध पदके देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. यंदा राज्यातील ४३ पदकप्राप्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आली. यादीत नागपुरातील आठ जणांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्वक सेवा दिल्याबद्दल अशोक बगमारे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे. ते सध्या राज्य राखीव दलाचे सहायक समादेशक म्हणून कार्यरत आहेत. बगमारे यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १३ वर्षे सेवा केली. या कालावधीत त्यांनी अनेक जहाल नक्षलवाद्यांविरुद्ध प्रशंसनीय कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदकासह विविध पदके मिळाली. अशाचप्रकारे गुणवत्तापुर्वक सेवा दिल्याबद्दल एन. झेड. कुमरे यांची पोलीस पदकासाठी निवड झाली. कुरखेडा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या कुमरे यांनी पीएसआय ते समादेशक असे कर्तव्य बजावताना करताना चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा दिली होती. गेल्या आठवड्यात विशेष शाखेतून त्यांची पदोन्नतीवर (सहायक आयुक्त ते राज्य राखीव दल ग्रूप नंबर १३ चे समादेशक) बदली झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शशिकांत माने यांनाही पोलीस पदक प्राप्त झाले. ते यापूर्वी लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. येथीलच राखीव पोलीस निरीक्षक बळीराम विठोबा जीवतोडे, राज्य राखीव दलातील पीएसआय दामोदरप्रसाद फतेशंकर सिंह, पीएसआय कौशलधर त्रिवेणीधर दुबे, राखीव फौजदार सच्चिदानंद कन्हैया राय तसेच फौजदार केशव किसन मोरे यांनाही पोलीस पदक घोषित झाले आहे. (प्रतिनिधी)
आठ पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव
By admin | Updated: January 26, 2015 01:03 IST