- योगेश बिडवई।मुंबई : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली. २४ जुलै ते १० आॅगस्टमध्ये कामकाजाच्या ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ केली.लासलगाव बाजार समितीत २४ जुलैला क्विंटलचे दर ८७० रुपये होते. ते १० आॅगस्टला २,४५० रुपये झाले. विशेष म्हणजे व्यापा-यांनी त्यानंतर १३ सप्टेंबरपर्यंत पुन्हा भाव पाडून ते १,४३० रुपयांवर आणले. बड्या व्यापा-यांनी ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी करून साठविलेला कांदा नफेखोरी करत आॅगस्टमध्ये तिप्पट दराने विकल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.उद्या लिलाव सुरू न केल्यास व्यापा-यांचे परवाने रद्द...नाशिक : प्राप्तीकरच्या छाप्यानंतर लिलाव बंद करून शेतक-यांना वेठीस धरणारे व्यापारी व १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी इशारा दिला आहे.सोमवारी लिलावात सहभागी न होणा-या व्यापा-यांचे परवाने रद्द करू असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे.बिंग फुटले : आॅगस्टमध्ये रेल्वेने कांद्याची किती वाहतूक झाली, याची माहिती प्राप्तीकर विभागाने मिळविली. कांदा २ हजारांवर गेल्यानंतर काही व्यापा-यांनीच परराज्यात मोठ्या प्रमाणात माल पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने संबंधित व्यापाºयांवर छापे टाकले.
कांदा व्यापा-यांचे भाववाढीचे रॅकेट; ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ, उद्या लिलाव सुरू न केल्यास परवाने रद्द...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:02 IST