मुंबई : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप संपवावा आणि भविष्यात या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी पारदर्शक धोरण आखण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य सरकार आणि एफटीआयआयच्या विद्यार्थी प्रतिनिधीला सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली.सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत धांडा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. याचिकेत असलेल्या सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. केंद्र सरकारला या संपावर तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत. जे विद्यार्थी लेक्चरला बसू इच्छितात त्यांना पोलीस संरक्षण द्यावे; तसेच अशा प्रकारच्या संस्थांवर अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी केंद्र सरकारला पारदर्शक धोरण आखण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. १८ विद्यार्थी लेक्चरला बसण्यास तयार आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. मुलांचे हित लक्षात घेता खंडपीठाने तसे निर्देश द्यावेत, अशी मागणीही धांडा यांनी केली.सर्व प्रतिवाद्यांना याचिका पाठवण्यात आल्यानंतर आणि त्यांची बाजू ऐकल्यानंतरच निर्देश देण्यात येतील, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली. चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांनी १२ जूनपासून संप पुकारला. एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे चौहान यांनी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या संपामुळे सर्व कॅम्पस उपक्रम बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची मागणी काय आहे?एफटीआयआयच्या अध्यक्षपदी टी.व्ही. अॅक्टर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी चौहान यांच्यापेक्षा अधिक अनुभवी व हुशार अभिनेत्याची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, असे धांडा यांचे वकील जयप्रकाश धांडा यांनी खंडपीठाला सांगितले.
अध्यक्षपद वाद हायकोर्टात
By admin | Updated: October 20, 2015 02:58 IST