ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १६ : केवळ संघाची प्रार्थना, गणवेश यांच्यात असलेली समानता हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख नाही. तर भारतातील विविधता व त्यात सामावलेली एकात्मता संघामध्येदेखील दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षावर्गातून कुठली पदवी नसली तरी यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून व संस्कारांमधून स्वयंसेवक घडतात. या वर्गातून शिक्षित होणारे स्वयंसेवक संघकार्य व देशाच्या सेवेसाठी समर्पितच असतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सोमवारपासून संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात झाली. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सहसरकार्यवाह व्ही.भागय्या, संघ शिक्षावर्गाचे सर्वाधिकार डॉ.वनिराजन, वर्ग कार्यवाह हरीष कुळकर्णी, पालक अधिकारी स्वांत रंजन हे प्रामुख्याने उपस्थित होते. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ८०० हून अधिक तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.संघशिक्षा वर्गाची परंपरा, इतिहास वाखाणण्याजोगा आहे. काळानुरुप हा वर्ग अधिक विकसित होत गेला. या वर्गात भारताच्या एकात्मतेचे दर्शन होते. संघशिक्षा वर्गातून स्वयंसेवकांनी साधना व तपस्येचा लाभ घेतला पाहिजे, असे होसबळे म्हणाले.संघशिक्षा वर्गाचा आराखडा देशभरात एकसारखाच आहे. परंतु विविध प्रांतांमधील वर्गांमध्ये त्या प्रातांमधील विशेषता, विविधता यांचे दर्शन होते. या संघशिक्षा वर्गांचे स्वयंसेवक घडविण्यात मौलिक योगदान आहे, असेदेखील होसबळे यांनी प्रतिपादन केले. संघाच्या ४१ प्रांतात जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात आली आहे. कडक उन्हातदेखील प्रशिक्षणसंघाच्या या वर्गात स्वयंसेवकांना विविध पातळींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपूरच्या कडक उन्हाळ्यातदेखील ठरविलेल्या वेळेप्रमाणेच दैनंदिन प्रशिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. पहाटे ४ पासून रात्री १० पर्यंतचा दिनक्रम ठरवून देण्यात आला आहे व त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील प्रशिक्षण वर्गात काही दिवस सहभागी होणार आहेत
प्रार्थना, गणवेश हीच संघाची ओळख नाही - दत्तात्रेय होसबळे
By admin | Updated: May 16, 2016 20:29 IST