मुंबई : भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधु आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी शिवसेना उपशाखाप्रमुखाला जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवली येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या जाहीर सभेसाठी चोगले नगर गणेश इमारतीसमोर व्यासपीठ उभारण्याचे काम सुरु होते. रस्त्यावरच हा व्यासपीठ उभारण्यात येत होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या भागात ये-जा करणा-या स्कूल बसना या व्यासपीठामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यासपीठ थोडेसे मागच्या बाजूस घ्यावे, असे स्थानिक रहिवासी व शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक यांनी डेकोरेटर्सला सांगितले. मात्र, ऐनवेळी प्रकाश दरेकर आणि त्यांचे साथीदार ठिकाणी दाखल झाले आणि आपणास शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे.या प्रकारानंतर बोरिवली दहिसर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटून अनेक शिवसैनिक दहिसर पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले होते. सुरेश महाडिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता अचानक कोसळले. पोलिसांनी त्यांना तात्काळ कांदिवलीतील शताब्दी रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. प्रकाश दरेकर आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप महाडीक कुटुंबीयांनी केला आहे. यावर, प्रकाश दरेकर यांनी मात्र सदर प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सभेचा स्टेज बांधण्याचे काम सूरू असताना महाडिक यांनी परवागी आहे का, असे विचारत हुज्जत घातली. त्यांना कोणीही मारलेले नाही असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रकाश दरेकर यांची शिवसैनिकाला मारहाण
By admin | Updated: February 14, 2017 04:02 IST