श्रीगोंदा (जि़ अहमदनगर) : भाजपाच्या उंबरठय़ावर असलेले आ. बबनराव पाचपुते यांचा राजकीय डाव उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील दोन्ही काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांची शनिवारी पुण्यात बैठक घेऊन नव्या राजकीय खेळीचा पट मांडला आहे. ‘एकास एक उमेदवार देण्याची तयारी करा, पुढची जबाबदारी माझी,’ असा सूचनावजा आदेशच त्यांनी दिल्याची माहिती राजकीय गोटातून पुढे आली आहे.
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात झालेल्या मेळाव्यात पवार काका-पुतण्यावर आरोपांची तोफ डागली. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी शरद पवार यांनी अजित पवार, मधुकर पिचड यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आ. पाचपुतेंचे ‘राजकीय ऑपरेशन’ करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत शरद पवारांनी श्रीगोंद्याचे प्रश्न व राजकारण यावर सुमारे तासभर चर्चा केली.
नागवडे, जगताप यांनी एकत्र बसावे आणि एक उमेदवार द्यावा. पक्ष आणि चिन्हाचा विचार करू नका, असा आदेशच पवार यांनी दिल्याचे बोलले जाते. घनश्याम शेलार यांच्याकडे सर्व कार्यकत्र्याना एकत्रित आणण्यासाठी तर प्रा. तुकाराम दरेकर यांना मतदारसंघाची माहिती संकलन करण्याची जबाबदारी दिल्याचेही सांगितले जाते.
बैठकीनंतर बंद खोलीत शरद पवारांनी शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर यांच्याबरोबर स्वतंत्र चर्चा केली.
आ. पाचपुते भाजपात जाण्यापूर्वीच पवारांनी नाकेबंदी करण्यासाठी पावले उचलली आहेत. नव्या राजकीय समीकरणामुळे श्रीगोंदा मतदारसंघ पवारांच्या रडारवर आले आहे. खुद्द पवारांनी पाचपुते विरोधकांच्या एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतल्याने पाचपुते-पवार संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा सामना पाचपुते कसा करणार, याविषयी मतदारसंघात उत्सुकता असेल. (प्रतिनिधी)
च्शनिवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब हराळ आदी नेत्यांसमवेत पवारांनी तासभर चर्चा केली.