मुंबई : शिवसेना भाजपा युतीमध्ये सोशल मीडिया, मुखपत्र व पोस्टरबाजीतून रंगत असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे़ सोमवारी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात उभय पक्षांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर आज शिवसैनिकांनी पुन्हा भाजपाच्या नेत्यांचे पोस्टर्स जाळून संताप व्यक्त केला़ मित्रपक्षाविरोधातच शिवसैनिकांनी घोषणाबाजी देत निदर्शने केली़ यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत़ भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळा टिष्ट्वटर युद्ध रंगले आहे़ त्यानंतर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून तर भाजपाने मनोगत या पाक्षिकातून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच ठेवल्या आहेत़ मात्र आत्तापर्यंत पोस्टर्स, सोशल मीडिया आणि शाब्दिक चकमकीपर्यंत असलेल्या या वादाचे रुपांतर सोमवारी घोषणाबाजी व निदर्शनामध्ये झाले़ बोरीवली येथील भगवती रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिल्यानंतर आज हा रोष पुन्हा रस्त्यावर उतरला़ शिवसेना पक्षप्रमुख यांची तुलना शोलेमधील असरानीबरोबर भाजपाने केली होती़ त्यास प्रत्युत्तर देत शिवसैनिकांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांचे पोस्टर्स, पुतळा चर्चगेट स्थानकाबाहेर आज जाळले़ तसेच त्यांना शकुनी मामा म्हणून संबोधले़ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्धही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)
शिवसैनिकांनी जाळले भाजपा नेत्यांचे पोस्टर्स
By admin | Updated: June 29, 2016 05:01 IST