विकास मिश्र , नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिका व सेवाभावी संस्थांनी गणेशमूर्तीचे तलावात विसर्जन न करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले होते. परंतु सोबतच आस्थेच्या नावाखाली तलावात ‘श्रीं’चे विसर्जन करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. रविवारी फुटाळासोबतच शहरातील इतर तलावात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन करण्यात आल्याने तलावाच्या प्रदूषणात भर पडली आहे. फुटाळा तलावाला शहराचे मरिन ड्राईव्ह म्हटले जाते. येथे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हा तलाव स्वच्छ असणे आवश्यक आहे. परंतु विसर्जनामुळे तलावात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात आले. आधीच तलावात कचरा व गाळ साचलेला आहे. त्यात पुन्हा निर्माल्याची भर पडली. तलावात प्रदूषण होऊ नये यासाठी विसर्जनासाठी कृत्रिम टँक व निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. परंतु अनेक भाविकांनी तलावात निर्माल्य टाकणे पसंत केले. फुटाळा तलावात दरवर्षी विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण होतो. हा गाळ काढला जात नाही. त्यामुळे भविष्यात या तलावाचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. या तलावाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही. मनपा प्रशासन व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी कृत्रिम टँकमध्ये विसर्जनासाठी आवाहन करीत होते. परंतु तलावात मूर्ती विसर्जित करणाऱ्यांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. शहरातील पदाधिकारी व राजकीय पक्षाच्या कार्यक र्त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे फुटाळा तलावात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात आले; सोबतच मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
आस्थेच्या नावाखाली तलावाचे प्रदूषण
By admin | Updated: September 28, 2015 02:34 IST