मुंबई : भिवंडी आगारात रिक्षा चालकांच्या मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एसटी महामंडळाने चालकाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही एसटी कामगारांमध्ये असंतोष दिसून आल्यानंतर, महामंडळाने कामगारांना आवाहन करणारे एक पत्रक जारी करत, एसटीतीलच ‘काहीं’कडून घटनेचे राजकारण केले जात असल्याचे सांगितले आहे. कामगारांच्या मनात दुहीचे बीज पेरण्याचे काम करत असल्याचा ठपकाच अप्रत्यक्षपणे कामगार संघटनांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटना आणि एसटी महामंडळ असा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. महामंडळाने राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना केलेल्या आवाहनात, चालकाच्या दुर्दैवी मृत्यूने प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याचे मन हेलावून गेले असल्याचे नमूद केले आहे. गायकवाड हे आपल्या एसटीच्या विशाल कुटुंबाचा कर्ता सदस्य होते. त्यांच्या नातलगांवर कोसळलेले हे संकट आपले समजून आपणच त्यांना धीर दिला पाहिजे, परंतु एसटी महामंडळातील काही मोजकी मंडळी या घटनेचे राजकारण करत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. आपल्या मनातील संवेदना आपण शांततेने प्रकट केल्या पाहिजेत, यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही, परंतु एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल करून अतिरंजित व खोटे लिखाण करून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजेच, आपल्या मातृसंस्थेची औद्योगिक शांतता भंग करून अशांतता निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनेकडून यावर कशा प्रकारची प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
एसटीतीलच ‘काहीं’कडून घटनेचे राजकारण
By admin | Updated: February 14, 2017 04:08 IST