राष्ट्रवादीचे आंदोलन : ‘आप’ व डावी आघाडीतर्फेही निषेध नागपूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षाकडून आंदोलने केली जात आहे. दरवाढीचा राजकीय भडकाही उडाला आहे. राष्ट्रवादीतर्फे निषेध डिझेल दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागातर्फे झांशी राणी चौकात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर पोळ्या बनवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. रेल्वे प्रवासी भाडे आणि मालवाहतूक भाडे वाढून जेमतेम एक आठवडा झाला असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या. भाज्या आणि धान्य यांचे भाव वाढत आहेतच. यातच कांद्याच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत. या महागाईमुळे सामान्यजनांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या दरवाढीचा निषेध करण्यात आला. राकाँ मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात सलील देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक राजू नागुलवार, दुनेश्वर पेठे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, राजेश कुंभलकर, तनुज चौबे, राहुल सोनटक्के, भूपेंद्र सनेश्वर, अजय मेश्राम, निर्मला सोनकांबळे, विजय गजभिये, रमेश गवई, बंडू धिरडे, विजय डोंगरे, प्रेम सावरकर, अमोल वासनिक, निनाद धुरडे, नरेंद्र शिरसागर, महेश काळबांडे आदी सहभागी होते. आम आदमी पार्टी ‘आप’तर्फे मंगळवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महागाईच्या विरोधात निदर्शने केली. जिल्हा संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात पियुश दापोळकर, डॉ. जिवतोडे, सुरेंद्र समुद्रे, अनुप, शालीनी अरोरा, विना भोयर, अंसार शेख, प्रशांत निलटकर आदी सहभागी झाले. डावी आघाडीभारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षांच्या डाव्या आघाडीतर्फे पेट्रोल, डिझेल दरावाढीच्या विरोधात व्हेरायटी चौकात नारे निदर्शने करण्यात आले. यावेळी मनोहर मुळे, अरुण लाटकर, रामेश्वर चरपे, मोहनदास नायडू, बाळ अलोणी, अजय शाहू, शाम काळे, मारुती वानखेडे, डॉ. शशिकांत वाईकर, राजू डबले, शकील पटेल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दरवाढीचा राजकीय भडका
By admin | Updated: July 3, 2014 01:01 IST