मुंबई: २६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवाद्यांइतकाच या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या अमेरिकेच्या डेव्हिड हेडलीविरुद्ध खटला चालवण्यासाठी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याला हजर करण्यासाठी अमेरिकेला ‘लेटर आॅफ रिक्वेस्ट’ पाठवण्यात यावे, असेही मुंबई पोलिसांनी अर्जात म्हटले आहे. २६/११ च्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला सय्यद झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल याच्यावर सध्या सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्याच्याबरोबर डेव्हिड हेडलीलाही न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात यावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी न्यायाधीशांना केली आहे. ‘२६/११ च्या हल्ल्यातील कटात अबू जुंदाल व डेव्हिड हेडली सहभागी होते. त्यामुळे या दोघांविरुद्ध एकत्रितपणे खटला चालवण्यात यावा. अमेरिकेने हेडलीला ज्या आरोपांतर्गत ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, ते आरोप भारत त्याच्यावर ठेवणार असलेल्या आरोपांपेक्षा वेगळे आहेत. त्याने केलेल्या गुन्ह्यांची दखल घेतल्यानंतर न्यायालय त्याच्यावर खटला चालवू शकते,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘मुंबईवर हल्ला करण्याचे षडयंत्र रचण्याच्या लष्कर-ए-तोयबाच्या कृत्यात सहभागी असल्याचे पुरावे आहेत. देशाविरुद्ध युद्ध छेडणे, बेकायदेशीर कृत्य करणे, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व अन्य गंभीर गुन्ह्यात हेडलीचा समावेश आहे,’ असे पोलिसांनी अर्जात म्हटले आहे.
डेव्हिड हेडलीविरुद्ध खटल्यासाठी पोलिसांचा सत्र न्यायालयात अर्ज
By admin | Updated: October 9, 2015 01:30 IST