मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचा ‘वॉच’ असणार आहे. यासाठी साध्या वेशातील पोलीस या पार्ट्यांमध्येही सहभागी होऊन तेथील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या रजा रद्द केल्या असून, पोलिसांची सर्वच पथके १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरात तैनात ठेवण्यात आली आहे.थर्टी फर्स्टच्या रात्रीच्या जल्लोषात सहभागी होणाऱ्या मुली, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पार्ट्यांमध्ये सहभागी होणार असून यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथके तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमलीपदार्थांच्या पार्टीवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाच सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त असे मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या १२ तुकड्या, राज्य दहशतवादविरोधी दल (एटीएस), बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, शीघ्र कृती दल, फोर्सवन, सिव्हिल डिफेन्स फोर्स आणि साध्या वेशातील पोलीस तैनात ठेवल्याचे पोलीस प्रवक्ते उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)- सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, मेटल डिटेक्टर यांच्या साहाय्याने संशयित व्यक्ती, सामान आणि वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.तसेच शहरातील हॉटेल्स, लॉज, मुंबईबाहेरून वास्तव्यास आलेले भाडेकरू यांचीही तपासणी पोलीस करीत असून, थर्टी फर्स्टच्या रात्री जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे.यात दारूच्या नशेत गाड्या चालविणारे, रस्त्यांमध्ये धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारणार असून त्यांचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीवर पोलिसांची नजर
By admin | Updated: December 31, 2016 03:44 IST