मुंबई : आपल्या आसपास गावठी दारूचा गुत्ता सुरू आहे, गावठीच्या फुग्यांची वाहतूक सुरू आहे अशी माहिती मिळताच पोलिसांची वाट न पाहता स्वत:च पुढाकार घेऊन असे गुत्ते उद्ध्वस्त करावेत, अशा सूचना पोलिसांकडून सर्वसामान्य रहिवाशांना दिल्या जात आहेत. मालवणी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर शहरातून गावठी दारूचे रॅकेट चालवणाऱ्यांना हद्दपार करण्यासाठी अशी नवी शक्कल पोलिसांनी लढवली आहे.दुसरीकडे उत्तर परिक्षेत्राचे अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील, परिमंडळ ११चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने गावठी दारूसोबत अन्य प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी अभिनव योजना आखली आहे. पोलीस आणि महिला असा समन्वय साधून गावठी दारूचे गुत्ते, गुत्ते चालक, वितरक, कॅरिअर यांचा पर्दाफाश केला जाणार आहे. हातावर पोट असलेले मजूर गुत्त्यांवर जाऊन स्वस्तात दारू पितात. या पार्श्वभूमीवर ठरावीक वस्त्या रडारवर घेऊन तेथील महिलांशी पोलीस समन्वय साधणार आहेत. मालवणी दारूकांड घडल्यानंतर अपर आयुक्त पाटील, उपायुक्त देशमाने यांच्या आदेशानुसार अशा प्रकारची कारवाई पश्चिम उपनगरात सुरू झाली आहे. दारूकांडानंतर अवघ्या दोन दिवसांत येथील पोलिसांनी तब्बल २०० ठिकाणी धाडी घातल्या होत्या. दारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. त्यामुळे गावठी दारूचे गुत्ते, वस्त्यांमध्ये अवैधपणे विकली जाणारी गावठी किंवा विलायती दारू याची खरी व नेमकी माहिती माहिलांकडून मिळू शकते. एकूणच महिलांच्या माध्यमातून गुन्हे व गुन्हेगारांबाबत माहिती मिळण्याचे स्रोत वाढतील, असे उपायुक्त देशमाने यांनी सांगितले.
गावठी दारूवर पोलिसांचा उतारा
By admin | Updated: June 23, 2015 02:50 IST