भिवंडी : पत्नीच्या नकळत गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास भिवंडी न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. हा ४० पिता गायत्रीनगरमध्ये राहात आहे. पत्नी घरी नसताना त्याने गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्याच अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याने आई व भावंडांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्याच्या पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी या नराधमाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. शनिवारी भिवंडी न्यायालयांत हजर केले असता, त्याला बुधवार २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणे विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने भिवंडीतील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आतेभाऊ कलंदर उर्फ दादू कादर बादशाह शेख यांस १२ वर्षांची शिक्षा सुनावली असतानाच, बापाने मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात उघडकीस आला. विशेष म्हणजे, हे दोन्ही गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. (प्रतिनिधी)
मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला पोलीस कोठडी
By admin | Updated: June 20, 2016 04:08 IST