भार्इंदर : मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयासह मुख्यालयासाठी जागा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक राजेश प्रधान यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना पत्र पाठवून जागा देण्याची मागणी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित असलेल्या आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस सरकारने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत शहरातील प्रस्तावित आयुक्तालयाचा आढावा घेतला. त्यात मिरा-भार्इंदरसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी प्रशस्त इमारत व मुख्यालयासाठी पुरेशी जागा निश्चित करण्याच्या सूचना अधिक्षकांना दिल्या. त्यानुसार अधिक्षकांनी २५ एप्रिलला पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्यात सुमारे पाच एकर जागा पोलिस आयुक्त कार्यालयासाठी तर २५ एकर जागा मुख्यालयासाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरीक्त पोलिस ठाण्यांसाठी गृहविभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी शहरात दोन पोलिस ठाणी सुरु झाली. शहराची लोकसंख्या वाढती असली तरी दोन ते तीन हजार लोकसंख्येमागे एक पोलिस कर्मचारी तैनात आहे. यावरुन शहरातील कायदा व सुव्यस्था वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे तोकडा पडत आहे. ही समस्या आयुक्तालयाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपासून सागरी आयुक्तालयासाठी पाठपुरावा सुरु होता. ते साकारण्याची ग्वाही माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी २०१३ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दिली होती. त्यासाठी उत्तन येथील सरकारी जागा निश्चित केली. या जागेची प्रक्रीया लालफितीत अडकल्याने शहराचा ठाणे आयुक्तालयात समावेश करावा, अशी मागणी पुढे आली. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्तालयासाठी भार्इंदरमध्ये जागा द्या
By admin | Updated: April 29, 2016 04:23 IST