ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मेक इन इंडियाच्या गिरगाव चौपाटीवरील व्यासपीठाला आग लागल्यानंतर निघून न जाता तेथेच थांबून आग आटोक्यात आणण्याच्या कामाला प्रोत्साहन देणा-या मुख्यमंत्र्यांना मुंबई पोलिसांनी मनापासून सलाम केला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवरील हा सलाम कौतुक मिश्रीत चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबईत मेक इन इंडियाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचं ब्रॅंडिग करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुस-या दिवशी म्हणजेच काल गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाच्या व्यासपीठाला कार्यक्रम सुरु असतानाच आग लागली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, आमीर खान यांची उपस्थिती होती. दरम्यान, या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिऴेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळीच होते.
ज्यावेळी आग लागली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा यंत्रणेने आणि पोलिसांनी घटनास्थळावरुन बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, ती नाकारत सर्वांना जोपर्यंत सुरक्षित स्थऴी हलविण्यात येत नाही, तोपर्यंत या ठिकाणीच थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या धैर्याला मुंबई पोलिसांनी सलाम केला आहे.