डोंबिवली : रेल्वे रुळातल्या तांत्रिक बिघाडामुळे (पॉइंट फेल) सिग्नल यंत्रणेवर परिणाम होऊन मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक गुरुवारी सकाळी विस्कळीत झाली. ही घटना कल्याण स्थानकाजवळ पत्रीपूल येथे सकाळी ७.५५ च्या सुमारास घडली. त्यामुळे जलद अप/डाऊन मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आणि कल्याणसह डोंबिवली-ठाण्याच्या प्रवाशांचे हाल झाले. जलद गाड्या कल्याण स्थानकातूनच धिम्या ट्रॅकवर वळवण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ झाला. सर्वच गाड्यांमध्ये सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत तुुडुंब गर्दी झाल्याने प्रवासी त्रस्त झाल्याची माहिती सागर गिलाणकर या अभियंत्याने ‘लोकमत’ला दिली. जलद मार्ग कधी सुरू होणार याची माहिती मिळत नसल्यामुळे डोंबिवली स्थानकातील फलाट ४ व ५ वरच्या प्रवाशांची धावपळ झाली. पादचारी पुलांवर तुडुंब गर्दी झाली होती.ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांनी गोंधळाचा अंदाज घेऊन मिळेल त्या गाडीने पुढचा प्रवास सुरू केला. ठाणे स्थानकातही धीम्या गाड्यांच्या फलाटांवर गर्दी उसळली होती. गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. साडेआठच्या सुमारास ही समस्या सोडवण्यात रेल्वेच्या तांत्रिक विभागाला यश आले आणि वाहतूक सुरू झाली. (प्रतिनिधी)
‘पॉइंट फेल’मुळे मरे विस्कळीत
By admin | Updated: September 12, 2014 02:35 IST