़पुणे : शहरात पावसाला सुरुवात झाली असतानाही वायपर (गाडीची काच पुसणारी स्वयंचलित यंत्रणा) नसलेल्या बस पीएमपीकडून शहरातील रस्त्यांवर उतरविल्या जात आहेत. त्यामुळे चालकाला काचेवर पाणी आल्यानंतर पुढील रस्ता तसेच वाहने दिसण्यास अडथळे येत आहेत. हा प्रकार गंभीर तसेच अपघातांना निमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पावसाळ्यातही पीएमपी कडून बसची पुरेशी देखभाल-दुरुस्ती केली जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा बस मार्गावर आणणाऱ्या बस पडत्या पावसात धोकादायकरीत्या मार्गावर आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या अपघातांची संख्या वाढली असून मागील महिन्यात पाच ते सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकारामुळे बसची नियमित देखभाल होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशातच आता वायपर नसलेल्या गाड्यांमुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर बसचालकाला पुढील वाहनांचा अंदाज घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता असल्याने तातडीने या प्रकारावर कारवाई करावी, अशी मागणी राठी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)>प्रवासी मंचाकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या सर्व बसचे ब्रेक तपासून सुस्थितीत आहेत का, वायपर अस्तित्वात / सुस्थितीत आहेत का, हेडलाईट्स, दिवे, इंडिकेटर कार्यरत आहेत का, गळणाऱ्या छताची दुरुस्ती झालेली आहे का, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा तातडीने बदलल्या आहेत का, मोडलेल्या, जाम झालेल्या, नादुरुस्त खिडक्या दुरुस्त केल्या आहेत का, चालकाला स्पष्ट दिसणारे सुस्थितीतील डावे, उजवे व मध्य भागातील आरसे लावले आहेत का, याची खात्री करूनच ही वाहने रस्त्यावर आणावीत, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.
वायपरविना धावताहेत पीएमपी
By admin | Updated: June 30, 2016 01:18 IST