ठाणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या ‘शिक्षक भारती’ या संघटनेतर्फे कोकण व नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीकरिता अनुक्रमे अशोक बेलसरे आणि राजेंद्र झाडे यांच्या उमेदवारीची आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी घोषणा केली.या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लागू केलेले शैक्षणिक धोरण पराभूत करण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार ही निवडणूक लढत असल्याचे पाटील म्हणाले. कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार बेलसरे १३ जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर नागपूरचे उमेदवार झाडे १६ जानेवारी रोजी आपला अर्ज भरणार आहेत. बेलसरे हे शिक्षक भारतीचे अध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी ही निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी सात हजार मते घेतली होती. त्यांचे तत्कालीन प्रतिस्पर्धी व सध्या संघटनेचे उपाध्यक्ष असलेले हिराजी पाटील यांना २१ हजार मते मिळाली होती. पण, या वेळी पाटील हेच बेलसरे यांच्या निवडणुकीची धुरा सांभाळत आहेत. विद्यमान शिक्षणमंत्र्यांचे अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे कारस्थान उधळून लावण्यासाठी शिक्षक भारतीने दोन्ही उमेदवार दिले आहेत. ६० वर्षांची शिक्षण मान्यता बदलून मनमानी पॅटर्न आणल्यामुळे राज्यातील शिक्षक सरप्लस झाले आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण करायला निघालेल्या शिक्षणमंत्र्यांसोबत आमच्या दोन्ही उमेदवारांची लढत असल्याचे पाटील यांनी सांगितले.>या वेळी मतपत्रिकेवर उमेदवारांचे फोटोपदवीधर व शिक्षक मतदारसंघात नावात साम्य असलेल्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर उभे करून मते घेण्याची राजकीय खेळी खेळली जात होती. मात्र, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर प्रत्येक उमेदवाराचा पक्ष व नावासोबत त्याचे छायाचित्र वापरले जाईल.नावात साम्य असलेला उमेदवार देऊन खुद्द कपिल पाटील यांची मते खाण्यात आली होती, तर काही बाद झाली होती. हा अन्याय दूर करण्यासाठी पाटील यांनी पाठपुरावा केला असता मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव, छायाचित्र आणि त्याचा पक्ष यांचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याचे पत्र भारतीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव मधुसूदन गुप्ता यांनी पाटील यांना दिले.
कोकणातून बेलसरे तर नागपूरमध्ये झाडे
By admin | Updated: January 7, 2017 05:41 IST