जयंत धुळप,
अलिबाग- जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’मधून रायगड जिल्ह्याकरिता एकूण ११ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण १८ कोटी रुपये खर्चाच्या नऊ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनास सादर करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.बी.हेजरे यांनी दिली आहे.पूर्वी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अस्तित्वात होता. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत होता. या पाणीपुरवठा योजनांसाठी राज्यांना केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागत होते. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी येणारा निधी बंद केला. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य शासनापुढे अडचणी येवू लागल्या. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल २०१६ मध्ये राज्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी राज्याची ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मे २०१६ मध्ये राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ जाहीर केला आहे. परिणामी आता ग्रामीण पाणीपुरवठा विशेषत: उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यात यश येवू शकणार आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात या ११ योजना राबविण्यात येणार आहेत. उरण तालुक्यातील रानसई आणि पनवेल तालुक्यातील आदई या दोन पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करण्याचे बाकी आहे. लवकरच ते पूर्ण होतील. उर्वरित१८ कोटी १९ लाख एवढ्या निधीचे नऊ प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविले आहेत. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, राज्यात ग्रामीण भागातील गाव, वाड्या, वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पुरवठा योजनांची देखभाल दुरु स्ती अशी कामे करण्यात येणार आहेत.>अलिबागमध्ये पाच योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत रायगडमध्ये होत असलेल्या नवीन नऊ पाणीपुरवठा योजनांपैकी अलिबाग तालुक्यात पाच योजना आहेत. नागाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी २३ लाख, कुर्डूस हद्दीतील रु ईशेत-भोमोली १ कोटी ९ लाख, नवेदर नवगाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ८१ लाख, कुसुंबळे येथील हेमनगरसाठी १ कोटी १३ लाख या पाच योजनांचा समावेश आहे. उर्वरित चारमध्ये पनवेल तालुक्यातील सावलेसाठी १ कोटी ८७ लाख, माणगाव येथील कावील-वहाळसाठी १ कोटी २८ लाख, उरण येथील कोप्रोलीसाठी १ कोटी ३७ लाख, रोहा तालुक्यातील वरसेसाठी ३ कोटी ६१ लाख असा एकूण १८ कोटी १९ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. >उन्हाळ्यासाठी नियोजनराज्य शासनाकडूून लवकरच या सर्व योजनांना मंजुरी मिळेल आणि पुढील सुमारे दीड ते दोन महिन्यात या योजनांचे काम पूर्ण होईल असे नियोजन असल्याने यंदाच्या उन्हाळ््यात या योजनांच्या क्षेत्रांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचा आहे.