आरक्षण दिवस : परिसंवादातील वक्त्यांचा सूर नागपूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून मागासवर्गीयांना प्राप्त संविधानिक आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे, असा इशारा आरक्षणाच्या विषयावर संबंधित परिसंवादात सहभागी वक्त्यांनी दिला.छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आरक्षण दिवस म्हणून पाळली जाते. यानिमित्त समता एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने शनिवारी हिंदी मोर भवन येथे ‘संसदेत प्रलंबित आरक्षण विधेयके’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील अंबिका रे, सेवानिवृत्त माहिती संचालक महेंद्र कौसल, विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जारोंडे, राज घरडे आणि सेंट्रल बँक बहुजन समाज कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रटरी पंजाबराव बडगे हे प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी बोलताना अॅड. अंबिका रे यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत प्रलंबित प्रकरणांची माहिती सादर केली. शासन व न्याययंत्रणा हे दोघेही आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठी दोषी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकार हे कायदेशीररीत्या मान्य करवून घेण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायाला अतिशय महत्त्व दिले होते. आज त्याची किती गरज आहे, हे लक्षात येते. न्यायपालिकेत मागासवर्गीय न्यायाधीशांचे प्रतिनिधित्व नसल्याने मागासवर्गीयांचे विशेषत: आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आंबेडकरवाद्यांनी वकिली व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आपल्या विचारांची मंडळी न्यायपालिकेत आली तर काही तरी होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र कौसल यांनी शाहू महाराजांना आरक्षणाची कल्पना कुठून सुटली याची माहिती सादर केली. नरेंद्र जारोंडे यांनी शाहू फुले आंबेडकरी संघटना विशेषत: कर्मचारी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. पंजाबराव बडगे, राज घरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रदीप गायकवाड यांनी भूमिका विषद केली. गुणरत्न रामटेके यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षड्यंत्र
By admin | Updated: July 27, 2014 01:22 IST