फलटण : खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक हणमंत वारे यांची वकिली करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला हजर राहिले नाहीत म्हणून चार राजकीय कार्यकर्त्यांनी फलटण येथील दोन दैनिकांच्या कार्यालयावर हल्ला करून साहित्यांची मोडतोड केली. कर्मचार्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. फलटण पोलिसांनी याप्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. फलटण येथे दि. २ मे रोजी पान-तंबाखू विक्रेते हुसेन महात यांच्या मृत्युप्रकरणी पोलीस अधिकारी वारे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर वारेंची बाजू मांडण्यासाठी हिंदू प्रजा पक्षाने पत्रकार परिषद बोलाविली होती. काही पत्रकार तेथे गेले असता येथे कोणीही नव्हते. दरम्यान, आमच्या बातम्या छापत नाहीत, असा आरोप करत बुधवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चौघे ‘ऐक्य’च्या कार्यालयात घुसले. त्यांनी दरवाजा बंद केला. एका कर्मचार्याला हे पत्रक छापा, असे म्हणतच हातातील काठ्या आणि लोखंडी गजाने काचेचा दरवाजा, संगणक टेबल, दूरध्वनीची मोडतोड केली. याला विरोध झाल्यानंतर संबंधित कर्मचार्याला शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. येथील घटनेनंतर चौघेही ‘सकाळ’च्या कार्यालयात घुसले आणि येथील कर्मचार्यांना दमदाटी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. येथेही त्यांनी तोडफोड केली. याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस निरीक्षक संजय बाबर आणि फौजफाटा येथे दाखल झाला. यानंतर आरोपींच्या शोधार्थ तत्काळ पथके पाठविण्यात आली. पिंपरद येथून एकाला तर अन्य तिघांना पंढरपूरमधून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते. (प्रतिनिधी)
फलटणमध्ये राजकीय गुंडगिरीचे ‘वारे’ चौघेजण ताब्यात
By admin | Updated: May 8, 2014 11:59 IST