मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मतदारांवर दबाव आणून मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाण्याचे किरण पाटील आणि सागर म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. २० आॅक्टोबर रोजी कल्याण येथील प्रीमियर कॉलनी मैदानावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून दिले तर २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापण्यात येईल, अन्यथा मतदारांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागले, अशी धमकीच मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिल्याचा दावा पाटील आणि म्हात्रे यांनी जनहित याचिकेत केला आहे. याचिकेत केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रम्, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - आयुक्तांकडे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी याची काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका
By admin | Updated: November 3, 2015 02:47 IST