- सोमवारपर्यंत कोठडी
मुंबई : शीना बोरा खून प्रकरणात पीटर मुखर्जीने ‘सक्रिय आणि महत्त्वाची’ भूमिका पार पाडल्याबद्दल केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) शुक्रवारी त्याच्याविरुद्ध खुनाचा व गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. शिवाय या प्रकरणात सुरुवातीस केलेल्या हलगर्जीपणाबाबत रायगड पोलिसांचीही चौकशी करण्याचे संकेत दिले.सीबीआयने न्यायालयात सांगितले की, ‘‘पीटरने शीना बोराचा खून व्हायच्या आदल्या दिवशी, खून झाला त्या दिवशी आणि खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लंडनहून इंद्राणी मुखर्जीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ बोलणे केले होते.’’ पीटर मुखर्जीच्या चौकशीतून खुनाचा नेमका हेतू उघड होईल आणि त्यासाठी आम्ही पीटर आणि इंद्राणी मुखर्जींच्या मुंबई-दिल्ली-गुवाहाटी-कोलकाता आणि विदेशातील आर्थिक हितसंबंधांचा तपास करू. शीनाचा खून झाल्यानंतरही पीटर मुखर्जीने आपला मुलगा राहुल याला ‘मी शीनाशी बोललो,’ असे सांगितले होते, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. पीटर मुखर्जीच्या कोठडीची मागणी करताना सीबीआयचे वकील अनिल सिंह म्हणाले की, ‘‘शीनाचा खून झाला त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी व खून व्हायच्या आदल्या दिवशी इंद्राणी मुखर्जीच्या संपर्कात पीटर होता. शीनाचा खून झाल्यानंतरही पीटरने मी तिच्याशी बोललो आहे आणि ती अमेरिकेत वास्तव्य करीत असल्याचे सांगून त्याची दिशाभूल केली. पीटरला सगळ््या गोष्टी माहीत होत्या व तो गुन्हेगारी कटात सहभागी होता, असे अनिल सिंह म्हणाले. शीनाची पर्स, एटीएम कार्ड आणि मोबाईल फोन जप्त करायचा आहे आणि पीटरने पुरावे नष्ट केले असू शकतात, असेही ते म्हणाले. तिघांच्या कोठडीत वाढपीटरला न्यायालयात हजर करण्याच्या काहीच मिनिटे आधी इंद्राणी, श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही त्याच न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांचीही कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. हा खून खटल्याची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात पुढील महिन्यापासून सुरू होईल. न्यायालयात इंद्राणी रडली.रायगड पोलिसांचीही चौकशीसीबीआयचा अधिकारी म्हणाला की,‘‘मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतरही रायगड पोलिसांनी एडीआरची नोंद का केली नाही याची विचारणा करून त्यांच्या भूमिकेचीही आम्ही लवकरच चौकशी करणार आहोत.’’