ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - शरद पवार काय बोलतात, ते कुणालाच कळत नाही आणि ते तसं करतही नाहीत. तसेच ते जे करतात ते बोलतही नाहीत असे उद्गार आज मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. स्थिर सरकारसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणा-या शरद पवारांनी मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असे उलट विधान आज केले, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला आहे. सध्या कोण कुणाबरोबर आहे तेच स्पष्ट होत नसल्याने आपण विरोधातच बसणे पसंत करू असे ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये जे साटंलोटं चाललेलं आहे त्यामुळे जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि निवडणुका आल्या तर हा संताप मतपेटीत उतरेल असेही ठाकरे म्हणाले. सध्याचं राज्यातलं राजकारण इमर्जन्सी वॉर्डमध्ये असल्याचे ते म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत शिवसेना व भाजपाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, याबाबत बोलताना ते असं करत असतिल तर चांगलंच आहे, त्यात वाईट काय असं सांगताना परंतु असे प्रयत्न कुणी केलेले नाहीत असंही ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिलेल्या भेटीमध्ये राजकारण बघू नये सांगत उद्धव ठाकरे यांनी काल अनेक लोक भेटायला आले होते असे म्हटले आहे.