मुंबई - आमचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला २००९ च्या निवडणुकीत ६२ जागा मिळाल्या होत्या. आता स्वबळावर सत्तेसाठी पक्षाला १४४ जागा लागतील. वाढीव ८२ जागा कुठून आणणार, या प्रश्नात तटकरे यांनी मान्य केले की मुंबई शहरात त्यांच्या पक्षाची ताकद नाही. तथापि, गेल्यावेळी तीन आमदार जिंकले होते. यावेळी १० पेक्षा अधिक आमदार निवडून येऊ शकतात. विदर्भात आम्ही चारचे चाळीस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र आमचा गड राहिला आहे. मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही आमची कामगिरी सुधारेल, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तटकरे यांनी फेटाळली नाही. राष्ट्रवादीने नेहमीच धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र राहाव्यात अशी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे सरकार झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान्य नसतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. या बाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून कोण असावे, हे ठरविण्याचा अधिकार काँग्रेसला कसा असू शकतो? पृथ्वीराज चव्हाण आम्हाला मान्य नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटलेले नव्हते. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही, एवढेच पवार म्हणाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्य हवे अशी विदर्भातील जनतेची इच्छा असेल तर राष्ट्रवादी या इच्छेसोबत असेल पण पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, असे तटकरे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - तटकरे
By admin | Updated: October 9, 2014 04:36 IST