मुंबई : पक्ष वाढवण्याचे काम फुलटाईम आहे, सगळ्यांनी पूर्ण वेळ द्यायलाच हवा, असे जाहीर आवाहन आज काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. खा. चव्हाण यांनी सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे माणिकराव ठाकरे यांच्याकडून स्वीकारली. यावेळी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मोहन प्रकाश यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. सुशीलकुमार शिंदे यांनी चव्हाण यांची कारकिर्द पक्षाला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, हा माझा तो तुझा याच्या पलिकडे आणि गटातटाच्या पुढे पक्ष न्यावा लागेल. लोकाश्रय असणाऱ्या नेत्यांना योग्य ती संधी न दिल्याने पक्षावर ही अवस्था आली असा टोला लगावताना त्यांनी जनाधार असणाऱ्यांना संधी द्यावी लागेल. गावापासून मुंबईपर्यंत ओळखणाऱ्यांना पुढे आणावे लागेल. असे अनेक कार्यकर्ते संधीची वाट पहात आहेत, असे म्हटले.या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि गुरुदास कामत अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. (विशेष प्रतिनिधी)
पक्ष वाढीचे काम फुल टाईम करणार !
By admin | Updated: March 10, 2015 04:25 IST