‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

By Admin | Published: August 10, 2014 01:38 AM2014-08-10T01:38:32+5:302014-08-10T01:38:32+5:30

वाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील

'Party Time' Accident 'Connection' | ‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

‘पार्टीटाइम’चे अपघात ‘कनेक्शन’

googlenewsNext

वेगाचा थरार नेतोय मृत्यूच्या जबड्यात
योगेश पांडे - नागपूर
वाऱ्याच्या वेगाने कार चालविण्याच्या नादात तीन दिवसांअगोदर नागपुरात दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. तरुणाईमधील वेगाचा थरार अन् वाहन चालविताना होणारा निष्काळजीपणा यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
विशेषत: रात्रीच्या सुमारास तर वेगावर नियंत्रण राहतच नाही. उपराजधानीमध्ये बाहेर जाऊन ‘पार्टी’ साजरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तरुणाईमध्ये तर हा ‘वीकली ट्रेन्ड’ झाला आहे. परंतु २०१३ या वर्षात याच ‘पार्टीटाईम’मध्ये म्हणजेच रात्री ९ ते १२ या वेळेत चक्क २४० अपघातांची नोंद करण्यात आली. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. अपघातांचे हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे.
साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ होते. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत वर्षभरात झालेल्या २४० अपघातांपैकी अनेक अपघात प्राणांतिक ठरले.
‘ड्रंकन ड्राईव्ह‘मध्ये त्रुटी
शहरात ‘ड्रंकन ड्राईव्ह’ ही मोहीम धडाक्यात राबविली जाते. या मोहिमेनुसार, अवघ्या सात महिन्यात (जानेवारी ते जुलै २०१४) पोलिसांनी ७५०० केसेस केल्या आहेत. त्यातून दंडापोटी ८० लाखांचा महसूलही गोळा केलेला आहे. नाही म्हणायला दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना त्यामुळे आळा बसतोच. मात्र, ही मोहीम चांगली असली तरी त्यात तीन प्रमुख त्रुटी आहेत. या त्रुटींपैकी एक म्हणजे, पोलीस केवळ रात्री ९ वाजेपर्यंतच मोहीम राबवतात. दुसरे म्हणजे, वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारवाईचा स्पॉट केवळ बार आणि वाईन शॉपजवळच असतो. तिसरी आणि महत्त्वाची त्रुटी म्हणजे पोलीस केवळ दुचाकी चालकांनाच (अपवाद एखादा कारवाला!) पकडतात. कार आणि आलिशान वाहनातून दारू-सिगारेट पित निघालेल्या वाहनचालकांना रोखण्याची हिंमत पोलीसदादा दाखवत नाहीत. त्यामुळे शहरातील लाऊंज, क्लब आणि हॉटेलमधून झिंगत बाहेर पडणाऱ्यांवर कोणताच वचक नाही. ही मंडळी वाहनातून नको ते वर्तन करीत सुसाट वेगाने रस्त्यावरून दौडते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या हातून निरपराध चिरडले जातात. रात्रीची वेळ असल्यामुळे निरपराधाचा जीव घेणारे किंवा कुणाला दुखापत करणारे ‘ते’ कुणाच्या नजरेतही येत नाही. ‘कुछ नही होता’ अशी त्यांची भावना झाल्यामुळे पुन्हा ते दुसऱ्या रात्री झिंगण्यासाठी सज्ज असतात.
शंभराहून अधिक तरुणांचा बळी
‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१३ या वर्षात उपराजधानीत १,३८१ अपघातांची नोंद झाली व यात ३४१ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तसेच अपघातांना कारणीभूत असलेल्यांमध्ये ३० वर्षांपर्यंतच्या तरुणाईचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे १०० इतके आहे. वाहन चालविताना अतिउत्साह, उन्माद अन् बेजबाबदारपणा यांच्यामुळे नागपुरातील रस्ते ‘किलर झोन’ ठरत आहेत.

Web Title: 'Party Time' Accident 'Connection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.