नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईविषयी नाराजी वाढू लागली आहे. नेरूळमधील रिक्षा चालकांनी उभारलेल्या मंदिरांवर कारवाई केली आहे. परंतु दुसरीकडे विभाग कार्यालयाजवळ पदपथावरील मंदिर जैसे थे आहे. याशिवाय शहरातील उद्यान व मैदानांमधील अतिक्रमणांनाही अभय दिल्याने नाराजी वाढू लागली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. कारवाई करताना कोणताही पक्षपात केला जावू नये अशा सूचनाही दिल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी पक्षपाती कारवाई होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अतिक्रमण विभागाने काही दिवसांपूर्वी नेरूळ पश्चिमेकडील साईबाबा हॉटेलजवळील साई मंदिर, सेक्टर ६ मधील गणेश मंदिर, रिक्षा स्टँडवरील इतर काही मंदिरांवर कारवाई केली. वास्तविक ज्या रिक्षा स्थानकांवरील बांधकामांवर कारवाई झाली त्या स्टँडची संघटना शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्याशी संबंधित होती. यामुळे कारवाई निष्पक्षपाती झाली की त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता, असा प्रश्न रिक्षा चालकांनी उपस्थित केला आहे. नेरूळच्या पश्चिम बाजूला जावून धार्मिक स्थळे हटविणाऱ्या विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाला लागून पदपथावरील हनुमान मंदिराला अभय दिले आहे. पदपथावर अतिक्रमण असून पुजारीही तेथेच खुर्ची टाकून बसलेले असतात. यामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. स्वत:च्या कार्यालयाजवळील बांधकाम तसेच ठेवून दुसरीकडे कारवाई करण्याचा उद्देश काय असेही विचारले जात आहे. वास्तविक सीवूडमध्ये मार्केटच्या भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे. सानपाडामध्ये मैदानाच्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. शहरात इतरही अनेक ठिकाणी सार्वजनिक वापराच्या भूखंडावर अतिक्रमण झाले असतानाही हे भूखंड मोकळे करण्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्वप्रथम प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून याविषयी सविस्तर माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविली जाणार आहे. पक्षपात असेल तर त्याची चौकशी करावी, अशी मागणीही केली जाणार आहे. (प्रतिनिधी)>नेरुळ विभाग कार्यालयाजवळ पदपथावर अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आले आहेत. अतिक्रमण विभागाने नेरुळ पश्चिम येथे जाऊन कारवाई केली आहे, परंतु स्वत:च्या कार्यालयाजवळील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे.
धार्मिक स्थळांवर पक्षपाती कारवाई
By admin | Updated: July 20, 2016 02:58 IST