मुंबई : वॉर्डस्तरावरील नागरी सुविधांसाठी राखीव ४०० कोटी निधीतील मोठ्या वाट्यावर हात साफ करीत शिवसेनेने विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली़ यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी पालिका सभागृह आज दणाणून सोडले़ बाकावर उभे राहून काहींनी निषेध व्यक्त केला; तर काँग्रेस नगरसेविकांनी चक्क अर्थसंकल्पीय कागदपत्रांचे बोळे करून महापौरांवर फेकले़ अखेर अभूतपूर्व गोंधळात ६ नगरसेविकांना एक दिवसासाठी निलंबित केल्याचे जाहीर करीत महापौरांनी सभा तहकूब करीत सभागृहातून काढता पाय घेतला.वॉर्डस्तरावरील नागरी कामांसाठी प्रत्येक नगरसेवकाला १ कोटी रुपये निधी मिळत असतो़ तसेच गटनेता, स्थायी समिती सदस्य व वॉर्डाची गरज आणि नगरसेवकाच्या मागणीनुसार उर्वरित निधीचे वाटप होत असते़ मात्र नगरसेवक निधीच्या वाटपानंतर वाढीव १७३ कोटींच्या निधीचे असमान वाटप करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेच्या महासभेत आज केला़ स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू होण्यापूर्वीच या गोंधळाला सुरुवात झाली़ विरोधी पक्षाचे काही नगरसेवक बाकावर उभे राहून निदर्शने करू लागले़ ‘शिवसेना हाय-हाय’ची घोषणाबाजी करीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या कागदांच्या अक्षरश: चिंधड्या केल्या; तर काँग्रेसच्या नगरसेविकांनी याच अर्थसंकल्पीय भाषणाचे बोळे करीत महापौर स्नेहल आंबेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या दिशेने भिरकावले़ त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षाचे बिंग फुटण्याआधी महापौरांनी सभा तहकूब केली़ निधीचे समान वाटप झाले असून, विरोधी पक्षांना गरज नव्हती म्हणून हा निधी सत्ताधारी पक्षातील गरजू नगरसेवकांच्या वॉर्डांना मिळाला, असा हास्यास्पद खुलासा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे़ सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी, विरोधकांनी सभागृहाचे यूपी-बिहार केले असल्याचा टोला लगावला़ तर यापूर्वीचे विरोधी पक्षनेते विचारांची लढाई विचारांनी लढत होते; मात्र विरोधी पक्षांनी आज ऐतिहासिक सभागृहाची शान धुळीला मिळवली, असा संताप स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी व्यक्त केला़ गैरवर्तणूक करून पालिका सभागृहाच्या कारभारात व्यत्यय आणणे अथवा सभागृहाच्या प्रतिष्ठेविरोधात कृत्य करणाऱ्या नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात येते़ काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ, पारुल मेहता, अजंठा यादव, अनिता यादव, वकारुन्नीसा अन्सारी, शीतल म्हात्रे यांना आज दिवसभराच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले़ (प्रतिनिधी)
मुंबईच्या महापौरांवर भिरकावले कागदी बोळे
By admin | Updated: March 10, 2015 04:28 IST