टी-९ रोटेशनचे आदेश : विठ्ठलवाडीसह कुठलाही आगार बंद होणार नाहीविलास गावंडे - यवतमाळराज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना किमान वेतन आणि कराराची थकबाकी १५ दिवसांनंतर दिली जाईल. शिवाय टी-९ रोटेशन लागू करण्यात येईल. विठ्ठलवाडी (मुंबई) आगारासह कुठलेही आगार बंद केले जाणार नाही. हा निर्णय वजा आश्वासन मंत्रालयात बुधवारी २ जुलै रोजी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सुमारे १ लाख २० हजारावर कामगारांना याचा लाभ होणार आहे.परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, प्रधान सचिव (परिवहन) शैलेशकुमार शर्मा, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यात एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात ना. चव्हाण यांनी वरील आश्वासन दिले. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या नाशिक येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कामगारांना थकबाकी दोन हप्त्यात देण्याचे मान्य केले होते. यानुसार पहिला हप्ता देण्यात आला. २०१२-१६ या कामगार करारातील थकबाकीची ५० टक्के रक्कम देण्यात आली. मात्र उर्वरित ५० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही. बुधवारी झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी ना. चव्हाण यांनी टी-९ रोटेशन लागू करण्याचे आदेश दिले. यामुळे वारंवार एकाच शेड्युलवर जाण्याच्या प्रकाराला पायबंद बसणार आहे. चालक-वाहक कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे चांगल्या दर्जाचे गणवेश देण्याचे मान्य केले. उर्वरित प्रश्नांची सोडवणूक लवकरच करून एक महिन्यात आढावा बैठक घेतली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या आश्वासनामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.
सव्वा लाख एसटी कामगारांना थकबाकी लवकरच
By admin | Updated: July 3, 2014 00:54 IST