मुंबई : राजभवनऐवजी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मंत्रिमंडळाचा विस्तार समारंभ झाला, पण या हॉलमध्ये प्रवेश न मिळाल्याने नव्या मंत्र्यांच्या असंख्य समर्थकांची निराशा झाली. जवळपास तीनएक हजार लोक विधान भवनाबाहेर उभे होते. मिळेल त्या वाहनाने आलेल्या कार्यकर्त्यांनी सकाळी ७पासूनच विधान भवनाबाहेर गर्दी केली होती. शपथविधीच्या वेळी सेंट्रल हॉल मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी, नव्या मंत्र्यांचे नातेवाईक आणि पत्रकारांनी भरलेला होता. विधान भवनात प्रवेश मिळूनदेखील गर्दीमुळे हॉलमध्ये जाऊ न शकलेलेही अनेक जण होते. विधान भवनाच्या दोन्ही गेटवर कार्यकर्ते, समर्थकांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली आणि खटकेही उडाले. तथापि, एकेका मंत्र्यांनी शपथ घेताच बाहेर त्यांचे समर्थक घोषणा देत, फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष करीत होते. कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले रासपाचे महादेव जानकर यांचे समर्थक विधान भवनाच्या मागील बाजूस मोठ्या संख्येने जमले होते आणि त्यांनी भंडारा उधळला. ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’ने परिसर दणाणून गेला. नवे मंत्री सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती. सदाभाऊंच्या प्रेमाखातर कार्यकर्ते, काही शेतकरी उत्साहाने आले होते. गुलाबराव पाटील समर्थकांची संख्याही मोठी होती. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ आदी घोषणा ते देत होते. (विशेष प्रतिनिधी)काम केलं नाही, तर मारीन : महादेव जानकर यांच्या ९१ वर्षीय मातोश्री आपल्या मुलाचा शपथविधी बघण्यासाठी आल्या होत्या. ‘पोरानं चांगलं काम करावं या माझ्या शुभेच्छा अन् आशीर्वादही आहेच, पण चांगलं काम केलं नाय तर मारीन,’ असेही त्या म्हणाल्या.
विधान भवनाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
By admin | Updated: July 9, 2016 01:23 IST