मुंबई : जागांबाबत आमचा घाटा झाला तरी महायुतीतील लहान घटक पक्षांचा तोटा होऊ देणार नाही, असा शब्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. महायुती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड असून ती तुटणार नाही, असे ते म्हणाले.महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या ११व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. त्याचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्ष आ. पंकजा मुंडे होत्या.यावेळी अनंतकुमार पाटील (अकोला), विजयराव मोरे (बारामती) आणि धोंडीराम वाघमारे या तीन माजी आमदारांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी जानकर यांना यावेळी राखी बांधली. कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष महायुतीसोबतच विधानसभेची निवडणूक लढवेल, असे जानकर यांनी जाहीर केले. मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइंचे अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पुंडलीकमामा काळे, भगवान सानप, बाळासाहेब दोडकल्ले, डॉ.चिंतामण जोशी, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
आमचा घाटा झाला तरी तुमचा तोटा होऊ देणार नाही
By admin | Updated: August 12, 2014 02:24 IST