मुख्यमंत्री फडणवीस : हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे घेतले दर्शननागपूर : माझ्या आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. संघातूनच मला राष्ट्रवाद आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ यांची शिकवण मिळाली. खऱ्या अर्थाने संघस्थानच माझी प्रेरणा ठरले या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. सोमवारी सकाळच्या सुमारास रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर स्मृतिमंदिर परिसराला त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे स्वयंसेवकांमध्येदेखील उत्साह दिसून आला.यावेळी हेडगेवार स्मारक समिती व संघाकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक डॉ.दिलीप गुप्ता, महानगर सहसंघचालक लक्ष्मणराव पार्डीकर, महापौर प्रवीण दटके हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपाचे नवनिर्वाचित आमदारदेखील उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अनुसरून राज्याचा राज्यकारभार चालवायचा आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि संघातूनच मला प्रथम राष्ट्र व समाज ही शिकवण मिळाली आहे. समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मोठी जबाबदारी आणि संधी मिळाली आहे व या संधीचे सोनं करण्याचा पूर्ण प्रयत्न करील असे ते यावेळी म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित संघ स्वयंसेवक तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केला.
संघस्थानानेच मला दिली प्रेरणा
By admin | Updated: November 4, 2014 01:02 IST