औरंगाबाद : पत्नी डी.एड. नसल्यामुळे शिक्षिकेसोबत लग्न करणाऱ्या शिक्षकाने पहिली पत्नी आणि तिच्या मुलाच्या संगोपनासाठी दरमहा १३ हजार रुपये पोटगी तसेच नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी डी.ए. डोईफोडे यांनी दिले.शहरातील मकसुद कॉलनी येथील रहिवासी समिना यांचा विवाह मुंबईतील शिक्षक महंमद खालेद महंमद इक्राम अन्सारी यांच्यासोबत झाला. समिना या डी.एड. झालेल्या नसल्याने खालेद यांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. खामगाव येथे लग्नाला जायचे सांगून तो समिना यांना औरंगाबादला घेऊन आला. युनूस कॉलनी येथे समिना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बळजबरीने गाडीतून उतरवून देऊन तो मुंबईला परतला. त्यानंतर खालेद याने त्यांच्याच शाळेतील शिक्षिकेसोबत दुसरा विवाह केला. दरम्यान दुसरे लग्न करण्यासाठीच पतीने घरातून हाकलून दिल्याची तक्रार समिना यांनी पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी घरगुती प्रकरण म्हणून त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही. त्यानंतर त्यांनी अॅड. नवाब पटेल यांच्यामार्फत न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता समिना यांना दरमहा ५ हजार रुपये, दोन मुलांच्या संगोपनाकरिता दरमहा प्रत्येकी अडीच हजार रुपये आणि घरभाड्यापोटी दरमहा ३ हजार असे एकूण १३ हजार रुपये देण्याचे आदेश प्रतिवादीला देण्याची विनंती केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्जदार महिलेस दरमहा १३ हजार रुपये द्यावेत, तसेच समिना यांना नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
विवाहितेला दरमहा १३ हजार पोटगी देण्याचे आदेश
By admin | Updated: December 29, 2014 05:06 IST