लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली/रायपूर: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागडमीधल कवंडे जंगल परिसरात माओवादी व पोलिस यांच्यात शुक्रवारी सकाळी चकमक उडाली. यात चार माओवादी ठार झाले. यामध्ये दाेन महिला व दाेन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर १४ लाखांचे बक्षीस होते.
कवंडे हद्दीत काही माओवादी दबा धरून बसल्याच्या माहितीवरून ३०० सी-६० जवान आणि सीआरपीएफची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या परिसरात रवाना झाली. त्यावेळी भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत हाेता. शुक्रवारी सकाळी शोध मोहीम सुरू असताना माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. तीन तास गोळीबार सुरू होता. पाेलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी पळून गेले. चकमकीत चार जहाल नक्षली ठार झाले. पाेलिसांनी एक रायफल, दोन ३०३ रायफल आणि एक भरमार बंदूक हस्तगत केली. सुकमा जिल्ह्यात दुसऱ्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.