पुणे : देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल, तर ती योग्यता मिळवून देणारा संघ हा एकमेव मार्ग आहे. कुणाचाही विरोध न करता व कुणाच्याही ओळखीचा धिक्कार न करता संघ देशाला हे परमवैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे हिंदुत्वाची व समरसतेची हाक दिली. पुण्याजवळील जांभे, मारुंजी व नेरे या गावांच्या सीमांवर संघाच्या पश्चिम प्रांताचा आज विराट असा शिवशक्ती संगम झाला. या वेळी सुमारे दीड लाख संघ स्वयंसेवकांची उपस्थिती होती. २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठाच्या मागे तोरणा किल्ल्याचे चित्र, राजगडावरील सदरेची प्रतिकृती आणि रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती उभारण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह मंत्री, आमदार, खासदार, शंकराचार्य व अनेक संतमहंतांची या संगमाला उपस्थिती होती. शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभाराचा दाखला देत भागवत यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘शिवत्वाची’ आपली परंपरा आहे. शिवरायांनी अखिल भारतीय विचार डोळ्यांसमोर ठेवला. स्वकीयांच्या राज्यासाठी ते झगडले. आजही शिव व शक्ती यांचा संगम आवश्यक आहे. शक्तीशिवाय सत्तेला महत्त्व प्राप्त होत नाही. देशाची शक्ती वाढली तरच सत्तेची प्रतिष्ठा वाढते हा जगाचा न्याय आहे. देशात विविधता आहे. तिच्याकडे भेददृष्टीने पाहू नका. समदृष्टीने पहा. सत्यात भेद व विषमता याला स्थान नाही. कायद्याने विषमता जाणार नाही, ती मनातून जायला हवी. निरनिराळ्या भेदांनी पोखरलेला समाज कितीही मोठा असला तरी त्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. सुसंघटित व सर्वांची चिंता करणारा समाज असला तरच तो आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे सांगून भागवत यांनी सामाजिक समरसतेचा मुद्दाही मांडला. दोन हजार वर्षे ज्यू विखुरलेले होते; परंतु समाजाचा संकल्प दृढ होता म्हणून बलवान असे इस्रायल राष्ट्र आज उभे राहिले, याचा दाखलाही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणाले होते की, आपल्यात राजकीय एकता आली; पण आर्थिक व सामाजिक एकता आल्याशिवाय ही एकता टिकणार नाही. भेदांमुळे आपला देश अनेकदा गुलामगिरीत गेला. गुणवत्तासंपन्न समाज निर्माण झाल्याशिवाय हे शक्य नाही, हे डॉ. केशव हेडगेवारांनी ओळखले होते.
देशाच्या उत्थानासाठी संघ हाच पर्याय
By admin | Updated: January 4, 2016 03:59 IST