मुंबई : वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि बुलडाणा येथे अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण अधिक असून, या भागातील अनधिकृत जोडण्यांविरुद्ध आता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आणि पुन्हा पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळणाऱ्या भागात अनधिकृत वीजवापर थांबविल्याशिवाय नवे ट्रान्सफॉर्मर दिले जाणार नाहीत, असा इशारा महावितरणने दिला आहे.ज्या भागात वितरण व वाणिज्यिक हानी जास्त आहे; अशा भागातच कृषिपंपाचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात एकूण ४६ मंडलात सुमारे २ लाख ३६ हजार ट्रान्सफॉर्मरद्वारे कृषिपंपांना वीज पुरवठा होतो. यापैकी अतिहानी असलेल्या १० मंडलात सुमारे १ लाखावर ट्रान्सफॉर्मर असून, याच भागात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. डिसेंबर २०१२ साली राज्य भारनियमनमुक्त झाल्याचा दावा महावितरणने केला असून, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडलातील वाहिन्यांवर वितरण व वाणिज्यिक हानीचे प्रमाण जास्त असल्याने भारनियमनात असलेल्या वाहिन्यांचे प्रमाणही जास्त आहे. या वाहिन्यांवर कृषिपंपांचा अनधिकृत वीजवापर, मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषिपंपाचा वापर, यामुळे ट्रान्सफॉर्मर अतिभारित होतात आणि जळतात. (प्रतिनिधी)
विजेचा अनधिकृत वापर थांबला तरच नवे ट्रान्सफॉर्मर
By admin | Updated: November 19, 2014 05:00 IST