ऑनलाइन लोकमत,ठाणे, दि. 17 - तब्बल एक कोटींच्या खंडणीसाठी खालीद कादरी (49) या मुंब्य्रातील इस्टेट एजंटचे अपहरण केल्यानंतर त्याची ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 1 आणि मुंब्रा पोलिसांच्या पथकाने थेट पाटणा येथून सुटका करून तिघा खंडणीबहाद्दरांना अटक केली. त्यांच्याकडून खंडणीतील 30 लाखांपैकी 29 लाख 89 हजार रुपये रोकड, तीन मोबाईल आणि गुंगीचे औषध हस्तगतही केले होते. याच गुन्ह्यासाठी खंडणीबहाद्दरांचा आणि अपहरण केलेल्या व्यापा-याचा असे दोन आणखी मोबाईल ठाणे पोलिसांनी पश्चिम चंपारण्य (बिहार) भागातून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नूर आलम (30), सैफीउल्ला खान (45) आणि इरफान खान (22, रा. तिघेही कंगली, जिल्हा बेतीया, बिहार) या तिघांना बिहारमधून 11 ऑगस्ट रोजी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. खंडणी उकळण्यासाठी वापरलेला मोबाईल त्यांनी भारत नेपाळ सीमेवरील दंडक नदीच्या कॅनलमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी फेकले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, हवालदार आनंदा भिलारे आणि शिवाजी गायकवाड यांच्या पथकाने 15 ऑगस्ट रोजी या कॅनलमधून नूर आलमचा मोबाईल शोधण्यात आला. तर त्याच्या एका मित्राच्या घरुन कादरी यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. खंडणी मागण्यासाठी याच मोबाईलचा त्यांनी उपयोग केल्याचे तपासात उघड झाले.एक कोटींची खंडणी मागून 30 लाखांची खंडणी कादरी यांच्या पत्नीकडून वरील तिघांनी स्वीकारली होती. त्यांच्या जिवाला धोका होऊ न देता अपहरणकत्र्यानी सांगितल्यानुसार बिहारमधील कंगली गावातून पोलिसांनी मोठया कौशल्याने त्यांची सुटका केली. त्यानंतर जुझबी माहितीच्या आधारे तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी मुंब्रा आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
एक कोटींची खंडणी, खंडणीबहाद्दरांचा मोबाईल हस्तगत
By admin | Updated: August 17, 2016 21:49 IST