लोणावळा : हैद्राबाद येथील होलसेल ज्वेलर्स व्यापारी पंकजकुमार मनसारामकुमार गुप्ता (वय ३६, रा. श्रीनगर कॉलनी हैद्राबाद, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) हे त्यांच्या दोन कामगारांसह खासगी प्रवासी बसमधून १ कोटी ६० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे घेऊन मुंबईला जात होते. या वेळी वलवण लोणावळा येथील हॉटेल एन. एच. या खासगी बस थांब्यावर चहापानासाठी थांबले. त्या वेळी बसमधून चोरट्यांनी त्यांच्या पायाजवळ ठेवलेल्या दोन बॅगांपैकी एक बॅग पळवली, असल्याची फिर्याद पंकजकुमार यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. बुधवारी (दि. ५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.पंकजकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे कामगार गोविंद पुरुषोत्तम आगरवाल व मोहंमद इसुफ खलिफा (दोघेही वय २१ वर्ष, रा. सिटी कॉलनी, पेटला ब्रुज हैद्राबाद, राज्य तेलंगणा) या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजकुमार हे काळ्या रंगाच्या लेदर बॅगमधून ४ किलो ७७८ ग्रॅम व ५०० मि.ग्रॅम वजनाचे ५७ नेकलेस व कानातील टॉप यांचा सेट, १९ नेकलेस व १५ लॉकेट यांचा सेट, कानातील कर्णफुले व २२ स्वतंत्र लॉकेट असे सोन्याचे दागिणे घेऊन मुंबईला जात असताना ही चोरी झाली आहे. सदरची चोरी ही त्यांच्याच कामगारांनी केली असावी असा पंकजकुमार यांचा संशय आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे हे तपास करत आहेत.
एक कोटीच्या दागिन्यांची चोरी
By admin | Updated: July 7, 2017 04:17 IST