अकोला : दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत वृद्ध दाम्पत्याचा जळून कोळसा झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री ३.३0 वाजताच्या सुमारास पोळा चौकातील भोईपुर्यात घडली. जुने शहरातील भोईपुर्यामध्ये कृष्णराव गायकवाड (८0) यांचे दुमजली जुनी इमारत आहे. सोमवारी रात्री कृष्णराव व त्यांची पत्नी कमलाबाई गायकवाड (७५) हे गाढ झोपेत असताना, पहाटे ३ वाज ताच्या सुमारास त्यांच्या कुडामातीच्या व लाकडाच्या घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीच्या झळाच्या अंगाला लागत असल्याने वृद्ध दाम्पत्य जागे झाले; परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आगीच्या उसळत्या ज्वाळांमुळे वृद्ध दाम्पत्याला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. त्यांनी आरडाओरड करण्याचाही प्रयत्न केला; परंतु त्यांची हाक कुणाच्याही कानी गेली नाही. या वृद्ध दाम्पत्याला अग्नी ज्वाळांनी घेरले होते. मदतीची याचना करीतच, त्यांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला. घरालगत राहणार्या रूख्माबाई पूर्णाजी बेले (६५) यांचेही घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते; परंतु रूख्माबाई घराच्या बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. भोईपुर्यात राहणारे शंकर चतरकर (४0) यांना गायकवाड यांच्या घराला आग लागल्याचे दिसताच, त्यांनी तातडीने जुने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर त्यांना घराच्या जिन्यामध्ये कमलाबाई तर घरातील एका खोलीमध्ये कृष्णराव गायकवाड यांचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले होते.
घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा कोळसा
By admin | Updated: September 25, 2014 03:07 IST