ठाणे : भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २३ आॅक्टोबर रोजी ठाण्यात आंबेडकरी नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ११ वाजता ठाण्यातील सेंट्रल मैदानात नागरिक जमल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यानंतर, त्यांना नाशिक येथे दलित कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करून त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी, कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण द्यावे आणि पाटील समितीचा अहवाल जाहीर करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.कोपर्डी गावातील घटनेनंतर राज्यभरात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत.अॅट्रॉसिटी कायद्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये जाणीवपूर्वक या कायद्याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत, गैरसमज थांबावेत आणि देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी हा मोर्चा आयोजिण्यात आला आहे. या वेळी रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिक मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक श्यामदादा गायकवाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राज गायकवाड, सुनील खांबे, पंढरीनाथ गायकवाड, बाबासाहेब निर्मळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संविधानाच्या सन्मानासाठी २३ आॅक्टोबरला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:37 IST