ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वाजतगाजत दिल्लीत आणण्यात आले. मात्र ओबामाही भाजपाच्या कमळात प्राण फुंकू शकले नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. मोदींचे ब्रह्मास्त्र आणि अमित शहांची जादू दिल्लीत चालली नाही असा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत.भाजपाला बोटावर मोजता येतील ऐवढ्याच जागा मिळाल्या असून याचे खापर फक्त किरण बेदींवर फोडून चालणार नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. फक्त घोषणा व भाषणांवर निवडणूक जिंकता येत नाही असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे. प्रत्येक वेळेला पक्ष कार्यकर्त्यांवर बाहेरुन आणलेला उमेदवार लादून चालणार नाही आणि मतदारांना गृहीत धरता येत नाही हे दोन धडे भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीतून शिकायला हवे असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला.