ऑनलाइन लोकमत
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे सुमारे ८६ जणांना बाधा झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा ८१ झाला आहे. तर १० जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. बुधवारी रात्री मालाड मालवणीच्या लक्ष्मी नगर परिसरातील अनेकांनी गावठी दारू प्यायली होती. या भागात मोठ्या प्रमाणावर बिगारी कामगार, रोजंदारी कामगार, मजूर राहतात. त्यातील अनेकांनी गावठी दारू प्यायली. गुरूवारी सकाळपासून अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात ८६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. ११ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर, २६ जणांचा रुग्णालयात दाखल करून घेतल्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ जणांना डायलेसिसवर ठेवण्यात आले आहे. १० जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
या घटनेची गंभीर दखल घेत आठ पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्यांविरोधात धडक मोहीम उघडण्यात आली आहे.