मुंबई : राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईचा आढावा घेऊन त्यात योग्य तो बदल केला जाईल, असेही मंत्री नाईक म्हणाले. विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले होते.
वर्षभरात १३ वाघांचा मृत्यू; सापळे, झुंजीमुळेही घटना गत एप्रिलपासून आजपर्यंत राज्यात १३ वाघांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी डुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यांत वाघ अडकले आहेत. आपले क्षेत्र पक्के करण्यासाठी झालेल्या झुंजीमध्ये काही वाघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या प्राणिसंग्रहालयात बीफऐवजी कोंबडीचे मांस दिले, त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोंबडीचे मटन का देण्यात आले, या बाबील जबाबदार कोण, याचीही चौकशी करण्यात येईल, असे वनमंत्री नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.