मुंबई : मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंट लागू झाल्याने या शहराचा टप्प्या-टप्प्यात होणारा विकास आता एकत्रितपणे होऊन सिंमेटच्या जंगलात कोंडत चाललेल्या मायानगरीला श्वास घेण्यासाठी अधिकाधिक जागा मिळेल़ मुळात क्लस्टर हा चार हजार चौ़मी़ भूखंडावर राबवला जाणार आहे़ या भूखंडावर असणाऱ्या विविध गृहनिर्माण सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास केला जाणार आहे़ यात मोकडळीस आलेल्या ४० वर्षे जुन्या इमारतींचाही समावेश आहे़ यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी लागणारा खर्च वाचणार आहे़ यात चार सोसायट्यांची मिळून एक इमारत होईल़ त्यासाठी मलनि:सारण वाहिनी, रस्ते व इतर सुविधा स्वतंत्र देण्याची गरज नाही़ एकाच खर्चात याची उभारणी होईल, असे अॅड़ गिरीष उटांगळे यांनी लोकमतला सांगितले़ यातील प्रत्येक इमारतीसाठी एकूण भूखंडाचा पंधरा टक्के भूखंड मोकळा ठेवण्याची आवश्यकता नाही़ यात केवळ एकूण चार हजार चौ़मी़ भूखंडाच्या पंधरा टक्के भूखंड मोकळा ठेवला जाईल व तो नागरिकांना मोठ्या प्रमाणात वापरण्यासही मिळेल़ या मोठ्या जागेत उद्यान किंवा मनोरंजन पार्क उभारता येईल़ यातील आणखी महत्त्वाची बाब म्हणजे क्लस्टरमध्ये रेन वॉटर हार्वेस्ंिटग बंधनकारक केले आहे़ यामध्ये मोठ्या टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यात साठवले जाईल व नंतर हे पाणी घरगुती कामांसाठी पुरवले जाईल़ त्यात हे पाणी किमान वर्षभर पुरेल एवढी त्या टाकीची क्षमता असावी लागते़ त्यामुळे पाण्याचा निम्मा प्रश्न सुटेल़ क्लस्टर इमारतींना पिण्यासाठीच पाणी द्यावे लागेल़ क्लस्टरमुळे विविध धर्मीय एकत्रित राहतील़ त्यामुळे मुंबईला याचा फायदा होईल व अधिकाधिक मोकळी जागा या शहराला मिळेल़, असे अॅड़ उटांगळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
आता मुंबई घेणार मोकळा श्वास
By admin | Updated: September 10, 2014 03:19 IST