गणेश वासनिक, अमरावतीपोलीस व महसूल खात्याच्या धर्तीवर आता वनविभागातील अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दिवे लावण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय पाठविण्यात आला असून अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक ते वनक्षेत्राधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर श्रेणीनुसार दिवे लागणार आहेत.पोलीस खात्यात भारतीय पोलीस प्रशासकीय (आयपीएस) सेवा, तर महसूल खात्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नेमले जातात. पोलीस खात्याप्रमाणे वनविभागाला जंगल, वन्यपशुंचे संरक्षण करावे लागते. परंतु आयएएस आणि आयपीएसच्या तुलनेत भारतीय प्रशासकीय वनसेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना त्यांच्या मनात होती. आता प्रादेशिक वनविभाग, व्याघ्र प्रकल्प आणि सामाजिक वनीकरण कार्यालयात असलेल्या एकूण ४० मुख्य वनसरंक्षकांना वाहनावर अंबर दिवा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सुमारे ८० उपवनसंरक्षकांच्या वाहनांवर फ्लॅशर दिवा, तर सहायक वनसंरक्षक, वनाक्षेत्राधिकारी व संरक्षक फिरत्या वाहनांवर फ्लॅश विरहित दिवे लावण्याची परवानगी शासनाने दिली आहे. अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक व ठाणे जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी वाहनांवर दिवे लावण्यास प्रारंभ केला आहे. विशेषत: पोलीस निरीक्षक ते पोलीस महासंचालक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांना वाहनांवर दिवे लावण्याची मुभा होती, त्याच धर्तीवर वनविभागाला परवानगी मिळाली असल्याने वनाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आता वनाधिकाऱ्यांच्या वाहनांवरही दिवे
By admin | Updated: January 5, 2016 03:18 IST